Wednesday, September 12, 2012

नंद चतुर्वेदी 7 कविताओंका मराठी अनुवाद लोक जाणतात

लोक जाणतात

विरोधांत ठाम उभे रहा
अन्याय आणि हिंसेच्या समोर,
अगदी ज्या काळांत
रिव्हॉल्वरच्या जोरावर मंत्रीपद मिळत असेल
तेंव्हाही

प्रवाहाच्या विरुद्ध जा
असं बोला की लोकांनी म्हणावं
काय मूर्खासारखं बोलतोस?
सत्य आणि ईमानाच्या गोष्टी करतोस?
मैत्री आणि उदारतेचे गुण गातोस?

जेंव्हा ते उपदेश देतील --
"अरे, घर भरून घे,
आज असशील, उद्या नसशील,
हीच वेळ आहे
खुर्चीचा उपयोग करून घेण्याची"--
तेंव्हा तुम्हीं खुर्ची फेका
गगनाला लपेटून घ्या
श्रमाने पिळदार झालेल्या बाहूत

सत्तेच्या बाजारांत
माशीसारखं घोंघावणं
चिपाड झाल्या घोड्यागत
शेपटी चाळवणं
"आपला चमचाच आहे मी "
अशी भाषा वापरणं
मरून जात असतो माणूस अशानं

कधी नव्हता पराजय ?
कधी नव्हती खोट्याची वाहवाही?
पण तीच वेळ असते
दलदलीतून बाहेर निघायची
भाग्य आणि चमत्काराने नाही तर
संघर्ष आणि जिद्दीने

लोक जाणतात --
नंग्या तलवारी घेऊन नाचणा-यांच्या
भ्याडपणाला
लोक जाणतात.
--------------------------------------------------------------------

No comments: