चांभाराची हत्या
तुझ्याबाबत मी कितीक विचार करतो
तुझ्या बाजूने उभं रहाण्याबाबत
ब्राह्मणवादाविरुद्ध लढण्याबाबत
अगदी पार एकविसाव्या शतकाबाबत......
कदाचित तेंव्हा,
हॉटेल शेरेटन,किंवा होटेल सिद्धार्थ,
किंवा वडा-पावाचा ठेला,
किंवा रोड-साईडचा ढाबा,
कुठेतरी बसून
न्हावी भंगी चांभारांबरोबर
मी अध्यात्मवादाची चर्चा करेन.......
पण आज ?
फक्त एक लोटी पाण्यासाठी
तू आमच्या विहिरीवर येतोस,
आमच्या शेकडो वर्ष जुन्या विहिरीत
तुझा दोर उतरत जातो --
पार खालच्या तळापर्यंत
आमच्या हातात विळे कोयते तयार आहेत
अमोघ वार करण्यासाठी प्रसिद्ध --
आई-बहिणीवरून शिव्या,
संकट-मोचनाचा संकल्प
तुझी पाण्याची लोटी
विहिरीच्या तळावर वाजते
एक हुंकार उमटतो
आणि विहिरीच्या पलीकडे
तुझे शिर जाऊन पडते
आमच्या मुलांचा गद्य-पद्य-संग्रह
रैदासाच्या कवितेने सुरु होतो
इकडे चांभारीण तुझे शिर घेऊन
कुठे कुठे जाते
पोलिस चौकी, आमदार, चौफुला
आणि रस्त्याच्या प्रत्येक वाटसरू पर्यंत
गांवक-यांवा काही दिवस लागतात
या शिरामागची कथा उमजेपर्यंत
काही काळ हत्यारे
शहरांत राहून येतात.
इकडे परीक्षेत
रैदासाच्या कवितेचा अर्थ लिहून
त्यांची मुलं पास होतात
आणि वरच्या वर्गांत चढवली जातात.
--------------------------------------------------------------
Sunday, October 21, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
anuvad bhuat sunder hua hai.
Post a Comment