Wednesday, September 12, 2012

नंद चतुर्वेदी 7 कविताओंका मराठी अनुवाद तू म्हटलीस तर

तू म्हटलीस तर

पुन्हा येऊ घातली आहे  फाल्गुनी हवा
सोनसळी गहू
डोलतोय डोंगर उतारावर
तू म्हटलीस तर पुन्हा एकदा
पलाश फुलांचा गुच्छ
उडवतो आकाशापात्तोर

कालपर्यंत सगळ्या खिडक्या बंद होत्या
तरी मी जाणत होतो
कि आता आकाशाने मुठीत
गुलाल भरून घेतला आहे
तू म्हटलीस तर पुन्हा एकदा
खिडक्या उघडून टाकतो
आणि दाखवतो तुझा चेहरा सूर्याला

होळी-गीतांची तयारी सुरु झालीय बाहेर
झांज आणि ढोलकी आणि मंजिरा
कवडश्यांची शत शत कमळं उमलताहेत नदीत
तू म्हटलीस तर पुन्हा एकदा
घेऊन येतो एक लाट तुझ्यासाठी
---------------------------------------------------------------

नंद चतुर्वेदी 7 कविताओंका मराठी अनुवाद या सायंकाळी

 या सायंकाळी

हल्ली रोजच पाहातो तुला
आजारपण, औषधं आणि
इंजेक्शनच्या डब्यांच्या जंजाळांत
रोज पाहातो तुझे धैर्य
पाहातो
कुठुनसा पाताळलोकातून येणारा
तुझा जीवन-निर्झर

वसंताची फुलं उमलत होती
तेंव्हा तुझ्याकडे पहायला फुर्सतच नव्हती.
एक स्त्री होण्या निभावण्यातच
संपले तुझे ते दिवस

आता या उरल्यासुरल्या उन्हांत
तुझ्याजवळ बसतांना
माझ्या स्वार्थीपणाच्या सावल्या
किती लांब दिसतात

स्वतःच्या सुखाचा एक एक खडा मोजतांना
गेल्या दिवसांना परतवून आणतांना
किंवा
भविष्यांतील अनिर्दिष्टाची  वाट पहाताना
हळहळतो

तुझा चेहरा
इतक्या जवळून कधीच पाहिला नाही
असता तर पडताळा घेता आला असता
कोणतं सुख-दुःख
देऊन गेले
हे ऊन आणि सावल्या
----------------------------------------------------------------------------

नंद चतुर्वेदी 7 कविताओंका मराठी अनुवाद लोक जाणतात

लोक जाणतात

विरोधांत ठाम उभे रहा
अन्याय आणि हिंसेच्या समोर,
अगदी ज्या काळांत
रिव्हॉल्वरच्या जोरावर मंत्रीपद मिळत असेल
तेंव्हाही

प्रवाहाच्या विरुद्ध जा
असं बोला की लोकांनी म्हणावं
काय मूर्खासारखं बोलतोस?
सत्य आणि ईमानाच्या गोष्टी करतोस?
मैत्री आणि उदारतेचे गुण गातोस?

जेंव्हा ते उपदेश देतील --
"अरे, घर भरून घे,
आज असशील, उद्या नसशील,
हीच वेळ आहे
खुर्चीचा उपयोग करून घेण्याची"--
तेंव्हा तुम्हीं खुर्ची फेका
गगनाला लपेटून घ्या
श्रमाने पिळदार झालेल्या बाहूत

सत्तेच्या बाजारांत
माशीसारखं घोंघावणं
चिपाड झाल्या घोड्यागत
शेपटी चाळवणं
"आपला चमचाच आहे मी "
अशी भाषा वापरणं
मरून जात असतो माणूस अशानं

कधी नव्हता पराजय ?
कधी नव्हती खोट्याची वाहवाही?
पण तीच वेळ असते
दलदलीतून बाहेर निघायची
भाग्य आणि चमत्काराने नाही तर
संघर्ष आणि जिद्दीने

लोक जाणतात --
नंग्या तलवारी घेऊन नाचणा-यांच्या
भ्याडपणाला
लोक जाणतात.
--------------------------------------------------------------------

नंद चतुर्वेदी 7 कविताओंका मराठी अनुवाद दुष्काळी शुभेच्छा

दुष्काळी शुभेच्छा --नंद चतुर्वेदी
अनुवाद लीना मेहेंदळे -- (अंतर्नाद मासिकांत प्रकाशित)

दुष्काळ आणि भुकेच्या पाशांत
सापडलेले झुंडभर लोक
दीर्घायु असोत,

सुखाच्या छोट्याश्या स्वप्नासाठी 
आसुसलेले लोक
दीर्घायु असोत,

आश्वासनांच्या फैरीवर फैरी
झाडणारे वक्तागण
दीर्घायु असोत,

या शुष्क उजाड जमिनीत
सरकारी जाहिरातींसाठी 
वसंत-गीत गाणारे 
कवि - पुत्र 
दीर्घायु असोत,

जोडे झिजवत सरकार-दरबारच्या बाबूंची
अजिजी करणारे 
बेकार युवक
दीर्घायु असोत,

पाण्याने तळ-गाठल्या विहिरींवर
लोटीभर पाण्यासाठी
झोंबाझोंबी करणा-या 
कुलस्त्रिया
दीर्घायु असोत,

घासलेटची वाट पहात
रिकामे डबे घेऊन
क्यू मधे पुढे जाण्यासाठी
धडपडते पेन्शनर
दीर्घायु असोत,

जराशा संकटात
देवावर भार टाकून
खाटल्यावर पडणारे 
भक्तजन
दीर्घायु असोत,

दीर्घायु असोत,
कृतिशून्यतेने भरलेले
बांडगूळ बुद्धिजीवी
दीर्घायु असोत,

दीर्घायु असोत,
खोपडीकांडांत मेलेल्या पोटी
अनुदान घेणारे परजीवी
दीर्घायु असोत,

दीर्घायु असोत,
आमच्या दुष्काळावर 
राजनीती करणारे
देशभक्त
दीर्घायु असोत,

हरेक प्रसंगी आमच्या 
दुबळेपणाचीच शुभेच्छा ठेवणारे 
आमचे बडबोले
दंतहीन, साठीपलीकडील नेतागण
दीर्घायु असोत,
ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ