Tuesday, November 15, 2016

एका अनुवादाची कथा -निजधर्म -केसरी २३ मे १९९९

रविवार दि. २३ मे १९९९ केसरी
एका अनुवादाची कथा
लीना मेहेंदळे

गेल्या वर्षी सुधीर मोघे केसरीसाठी ‘स्वच्छंद’ या सदरातून सुमारे वर्षभर लेखन करीत होते. डिसेंबरमध्ये आम्ही सहज भेटलो तेंव्हा  त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांबद्दल एका योगायोगाने घडून गेलेल्या प्रसंगाची आठवणदिली . तात्यासाहेबांची एक खूप जुनी कविता त्यांच्या कोणत्याहि काव्यसंग्रहात यायची राहून गेली होती. पण मोघेंना त्या कवितेचे भारी अप्रूप वाटून त्यांनी तेव्हापासून ती कविता स्मरणांत ठेवली होती व  कित्येक प्रसंगी आता ही तात्यासाहेबांची कविता असे सांगत म्हणून दाखविली होती. दुस-या कलाकाराची चांगली कलाकृति आवडली की, कुठल्यातरी अंतरंग प्रक्रियेने ती कलाकृति आपलीच असावी, इतके आपण भारावून जातो. तसेच सुधीर मोघेंचे या कवितेबद्दल झाले होते. पुढे कधीतरी ही बातमी (म्हणजे मोघे यांनी ती कविता कशी जपली, कशी म्हटली, इत्यादी) तात्यासाहेबांपर्यंत पोचून त्यांचे कौतुकाचे पत्र मोघेंना आले वगैरे सविस्तर आठवण त्यांनी सांगितली.

मीही नुकतेच तात्यासाहेबांच्या कवितांचे अनुवाद केले होते व माझ्यामते ते छान जमले होते. सुधीर मोघेंसारखे कवि  भेटल्यावर हा कविता अनुवादाचा विषय निघालाच. मी त्यांना माझे काही अनुवाद ऐकवले. विशेषतः ज्या कविता  खास लयीत होत्या व त्यांचा अनुवादही तसाच काव्यमय व लयमय होऊ शकला होता अशा कविता. मोघेंना ते अनुवाद आवडून पटकन त्यांनी म्हटले, तर मग ही माझी आवडती कविता पण उतरवून घ्या आणि हिचा पण अनुवाद करा. ही तुम्हाला तात्यासाहेबांच्या प्रकाशित काव्यसंग्रहात सापडणार नाही, पण अनुवाद तुम्हाला छान जमेल.
ती कविता उतरवून घेत असतानाच मी म्हटले, छे फार कठीण जाईल या कवितेचा अनुवाद करताना. तरी पण कविता लिहून घेतली
आणि अजून तात्यासाहेबांच्या कवितांचा अनुवाद करण्याचा मूड चालूच आहे. अनुवादही होत आहेत. या भारावलेल्या अवस्थेत ती कविता पण अनुवादित केली ती अशी-

निजधर्म
गुण दिन का होता प्रकाश है
रात्री का गुण श्यामलता
नभका गुण हैं निराकारता
मेघों का गुण व्याकुलता

श्रेयस्कर वह हो या ना हो
निजधर्म बिना है नही गति
कैद चराचर अपने गुण में
वहीं मुक्तता वहीं रति

क्या कह सकते कभी धरासे
नदिया के सम बही चलो?
चकाचौंध बिजली को, फूलोंपर
शबनम सी खिली रहो?

ऐसा ही मेरा होना भी
इसके जैसा एक यही
कालचक्र की अनंततामें
एक समान दूजा नाही 

अछेद्य मुझसे अभेद्य मुझसे
बुरा-भलापन मेरा
छूट गया गर शून्य के सिवा
बाकी रहा क्या मेरा?

निजधर्म

दिवसाचा गुण प्रकाश आहे
रात्रीचा गुण श्यामलता।
गुण गगनाचा निराकारता
मेघांचा गुण व्याकुळता।।

श्रेयस्कर तो असो नसो वा
निजधर्माविण नाही गति।
कैद चराचर अपुल्या ठायी
त्यात मुक्तता त्यात रति।।

सांगशील का कधी धरेला
वाहत जा तू जळापरी।
धगधगत्या बिजलीस बसाया
दवाप्रमाणे फुलावरी।।

तसेच मी पण आहे माझे
त्यांसारखे तेच असे।
अपार काळामध्ये बनावट
एकाची दुस-यास नसे।।

अभेद्य असले अजिंक्य असले
भले-बुरे पण तुटेल का?
तुटल्यावरती आणिक काही
शून्यावाचून उरेल का?
-कुसुमाग्रज

Thursday, November 10, 2016

हिमप्रस्थ व अक्षरपर्व - कुसुमाग्रज कविता

हिमप्रस्थ - कुसुमाग्रज कविता